Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांना मिळालेला नव्हता. त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी बघत होत्या. त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत महिलांना एकूण १३ हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे देखील पैसे आजपासून लाडक्या बहीणींना मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे,” असे त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी ३४४.४० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला देण्यासंदर्भातील शासन निर्णय ९ सप्टेंबरला जारी केला होता. त्यानंतर आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्मानिधी म्हणून महिलांना १५०० रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच अनेक लाभार्थी महिलांना खात्यावर पैसे आल्याचे मेजेस देखील येऊ लागले आहेत.