अहमदनगर /नगर सह्याद्री : दूध उत्पदक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. दुधाचे पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे जे अनुदान होते ते आता मार्चअखेर जमा होणार आहे अशी माहिती दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शनिवारी (दि.१६) सकाळी पारनेर येथील दूध व्यावसायिकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत आपली व्यथा मांडली होती. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी माहिती दिली. पारनेर तालुक्यातील दूध उत्पादकांना ७० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुधाचे बाजार कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. अकरा जानेवारीपासून सुरू केलेली ही योजना १० फेब्रुवारीपर्यंत होती. त्यानंतर त्यात मुदतवाढ करून ती १० मार्चपर्यंत करण्यात आली होती.
दरम्यान या योजनेचे अनुदान अद्यापही प्राप्त झालेले नव्हते. आता या दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मार्चअखेर या दूध उत्पादकांच्या खात्यावर हे अनुदान जमा होणार असल्याची माहिती शनिवारी सकाळी दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.