आयुक्त यशवंत डांगे यांची माहिती
अहमदनगर | नगर सह्याद्री
गणेशउत्सव जवळ आला की भक्तांच्या आनंदोत्सवात भर पडत असते. मित्र मंडळ मंडळांची परवानगी घेण्यासाठी धावपळ सुरू होत असते. ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य यांना विविध कार्यालयात परवानगीसाठी जावे लागते. त्यामध्ये वेळ वाया जातो. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ऑनलाइनचा वापर करत मंडळांना अधिक सोयीचे व्हावे यासाठी एका लिकवर परवानगी मिळणार आहे. महापालिका हद्दीतील मंडळांनी ऑनलाइन अर्ज भरून आपल्या कागदपत्राची पूर्तता करावी, त्याला घरबसल्या परवानगी मिळणार असल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
अहमदनगर महापालिकेच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त मंडळांसाठी व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, उपायुक्त सपना वसावा, सहाय्यक आयुक्त प्रियंका शिंदे, सहाय्यक आयुक्त निखिल फराटे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, मुख्यलेखा अधिकारी डॉ. सचिन धस, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, नाना गोसावी, राकेश कोतकर, संगणक प्रमुख अंबादास साळी, इंजिनीयर गणेश गाडळकर आदी उपस्थित होते.
मंडळांनी अर्ज भरून परवानगी मिळवावी
गणेश उत्सवाच्या काळामध्ये मंडळांना नगररचना, वाहतूक पोलीस शाखा, एम एस सी बी, पोलीस विभाग, महापालिका अतिक्रमण विभाग आदींची परवानगी तातडीने मिळावी त्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्माण केले. त्यावर मंडळांनी अर्ज भरून द्यावा त्यांना एका लिकमध्ये घरबसल्या मंजुरी मिळणार आहे. शहरांमध्ये १२८ मित्र मंडळ असून यापैकी २४ मंडळांनी या ऑनलाइन वेबसाईटवर अर्ज दाखल केला आहे. तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले