Monsoon Update: देशात जून ते सप्टेंबर या काळात सर्वसामान्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, संपूर्ण चारही महिने वरुणराजा प्रसन्न राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी आणि जलसाठ्यांसाठी आशादायक ठरण्याची चिन्हं आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, देशात जून ते सप्टेंबर या काळात पावसाचे प्रमाण सामान्य ते सरासरीहून जास्त असेल. विशेषतः मध्य, पश्चिम आणि ईशान्य भारतात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे कृषीप्रधान राज्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एकूण १०६ टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता असून, यामध्ये १०४ ते ११० टक्के दरम्यानचा पाऊस सामान्यपेक्षा अधिक मानला जातो. तर ९६ ते १०४ टक्के दरम्यान पाऊस झाल्यास तो सामान्य मानला जातो. ९६ टक्क्यांपेक्षा कमी पावसाला सामान्यपेक्षा कमी मानला जातो. या पार्श्वभूमीवर यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याने कृषी आणि जलव्यवस्थापनासाठी ही बाब फायदेशीर ठरणार आहे.
दक्षिण भारतातून मान्सूनचा प्रवेश लवकर होण्याची शक्यता असून, त्याचा संपूर्ण देशावर चांगला परिणाम होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जर अंदाज खरा ठरला तर हे गेल्या १६ वर्षांतील वेगात पुढे सरकणारे पहिलेच मान्सून ठरेल. यापूर्वी २००९ मध्ये अशाच वेगाने मान्सून देशात दाखल झाला होता.
दक्षिण अंडमानपासून सुरू होणारा मान्सूनचा प्रवास यंदा अधिक गतीने होत असून, त्याचा परिणाम पश्चिम आणि उत्तर भारतात लवकर पावसाळा सुरू होण्यावर होईल. या वर्षी भारतीय हवामान विभागाने पहिल्यांदाच सखोल पातळीवर अभ्यास करून अंदाज प्रसिद्ध केला असून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.