मुंबई ।नगर सहयाद्री:-
भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ) ही एक महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
आतापर्यंत सरकारने एकूण २० हप्ते वितरित केले आहेत. शेतकऱ्यांमध्ये सध्या २१व्या हप्त्याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते. पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता दिवाळीआधी मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
याबाबत कोणतीही अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, जुलैचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जुलैचा हप्ता हा ऑगस्टमध्ये देण्यात आला होता. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.त्यामुळे हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आता आधीचा हप्ता २ महिने उशिरा आला त्यामुळे हा हप्तादेखील उशिरा येऊ शकतो. त्यामुळे डिसेंबरमध्येदेखील पैसे येऊ शकतात. याचसोबत सणासुदीच्या काळात पैसे जमा करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे या योजनेचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.