अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान 21.84 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. सुमारे 494.13 कोटी रुपयांच्या खर्चात हा मार्ग उभारण्यात येणार आहे. शनिशिंगणापूर हे दररोज 30 हजार ते 45 हजार भाविकांची गर्दी असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सध्या येथे थेट रेल्वे सुविधा नसल्यामुळे यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागतो.
नवीन रेल्वे मार्गामुळे भाविकांसह राहुरी, नेवासा आणि परिसरातील नागरिकांच्या प्रवासाला मोठी सुविधा होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहुरी येथील राहु-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर, पैस खांब करवीरेश्वर मंदिर यांसारख्या धार्मिक पर्यटन स्थळांना चालना मिळणार आहे, परिणामी स्थानिक पर्यटन व अर्थव्यवस्था मजबूत होईल.
सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे वार्षिक 18 लाख प्रवाशांना फायदा होईल. या प्रकल्पाला राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मंजुरी मिळाली आहे. शनि शिंगणापूर हे भारतातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र असून, या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधा मजबूत होतील व पर्यटनाला चालना मिळेल.