मुंबई / नगर सह्याद्री –
महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत. निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उमेदवारीसाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग केली जात आहे. कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. पण त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाकडून इच्छुक उमेदवाराला आनंदाचा धक्का दिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादित वाढ करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ही वाढ थोडी नव्हे तर दीड पट आहे. याचा उमेदवाराला मोठा फायदा होणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचारासाठी जास्त आर्थिक मोकळीक मिळेल. गेल्या काही वर्षातील वाढलेली महागाई, मतदारांची संख्या, विविध खर्च पाहून आयोगाकडून उमेदवाराच्या खर्चात वाढ केली आहे.
खर्चाची मर्यादा किती होती? आता किती झाली ?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या आधी जिल्हा परिषदांसाठी सहा लाख आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाखांची मर्यादा होती, ती आता वाढवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या आधारावर खर्चमर्यादा ठरवली जायची, आता ती वर्गवारीनुसार ठरवली गेली आहे. साधारणपणे महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांसाठी खर्चाची मर्यादा आठ लाख ते दहा लाख होती ती आता नऊ लाख ते पंधरा लाख करण्यात आली आहे.
कोणत्या शहरातील उमेदवार किती खर्च करणार?
मुंबई महापालिका, पुणे महापालिका नागपूर महापालिका – १५ लाख रुपये
पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे महापालिका – १३ लाख रुपये
कल्याण डोंबिवली, छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई,वसई विरार – ११ लाख रुपये
ड वर्गातील 19 महापालिकांसाठी – ९ लाख रुपये
अ वर्ग नगर परिषद –
नगरसेवक -५ लाख रुपये
थेट नगराध्यक्ष- १५ लाख रुपये
ब वर्ग नगरपरिषद
नगरसेवक – साडेतीन लाख रुपये
नगराध्यक्ष – ११. २५ लाख रुपये
क वर्ग नगरपरिषद
नगरसेवक – २. ५०लाख रुपये
नगराध्यक्ष- ७. ५० लाख रुपये
नगरपंचायत
नगरसेवक-२. २५ लाख रुपये
नगराध्यक्ष- सहा लाख रुपये



