अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शेतकऱ्यांना आता माती तपासणीसाठी शहरात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY) अंतर्गत २०२५-२६ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे जमिनीची सुपीकता तपासण्याची सुविधा गावातच उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार
गावातच मृद परीक्षणाची सोय झाल्यामुळे पिकांसाठी आवश्यक खतांचे प्रमाण अचूक कळणार असून, अनावश्यक रासायनिक खतांचा वापर टाळता येणार आहे. यामुळे पिकांचे उत्पादन वाढून जमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवता येणार आहे.
१८ वर्षांवरील तरुण-तरुणींना संधी
या प्रयोगशाळा दहावी उत्तीर्ण व १८ वर्षांवरील तरुण-तरुणींना चालवण्यासाठी संधी दिली जाणार असून, प्रत्येक प्रयोगशाळेसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. या रकमेतून उपकरणे, रसायने व आवश्यक साहित्य खरेदी करता येईल.
शासनाकडून मिळणार अनुदान
ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वय १८ वर्षांपेक्षा जास्त असलेले तरुण व तरुणी अर्ज करू शकतात. अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर शासनाकडून अनुदान मंजूर केले जाईल.
अर्जदारांची निवड सोडतीद्वारे
ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळेसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्यास पात्र अर्जदारांची निवड सोडतीद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी वेळेत पूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे जिल्हा कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.