spot_img
अहमदनगरअधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणारा गोल्डन गेटचा पर्दाफाश!, वाचा नगर क्राईम

अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणारा गोल्डन गेटचा पर्दाफाश!, वाचा नगर क्राईम

spot_img

​अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या गोल्डन गेटचा पोलसांनी पर्दाफाश केला आहे. ‘गोल्डन गेट फिन्सर्व्ह’ आणि ‘आर एस ग्रुप ऑफ बिझनेस’ या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून तीन गरीब मजुरांची ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार तपासात उघडकीस आला. या संघटित गुन्ह्यामध्ये ऋषिकेश तोरडमल (रा. भिंगार) याच्यासह दत्तात्रय तोरडमल, मनीषा तोरडमल, प्रतिक्षा तोरडमल, कोमल क्षीरसागर, गणेश क्षीरसागर (रा. बालमटाकळी), वृषाली भालेराव, सचिन भालेराव (रा. भिंगार), प्रतीक गुरव (रा. पाथर्डी), किरण तोरडमल (रा. बारादरी), आणि सागर तोरडमल (रा. पुणे) यांचा समावेश आहे. फिर्यादी ​तानसेन सुरेश बिवाल (रा. राहुरी), मनीष दिपक सोलंकी, आणि एक महिला (दोघे रा. भिंगार) यांनी जानेवारी २०२५ मध्ये आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी फिर्यादींना त्यांच्या ‘गोल्डन गेट फिन्सर्व्ह’ आणि ‘आर एस ग्रुप ऑफ बिझनेस’ नावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास १२ टक्के ते १५ टक्के परतावा मिळेल, असे सांगितले. इतर गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्याच्या नोंदी संगणकावर दाखवून आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. ​या आमिषाला बळी पडून, तानसेन बिवाल यांनी एकूण ९ लाख ९० हजार रुपये, मनीष सोलंकी यांनी ५ लाख ५० हजार रुपये, आणि दुसऱ्या एका महिलेने ५ लाख रुपये रोख स्वरूपात आणि आरटीजीएस पद्धतीने आरोपींच्या कंपन्यांमध्ये गुंतवले. गुंतवणुकीची खात्री म्हणून त्यांना काही धनादेश देण्यात आले. ​काही काळ आरोपींनी परतावा दिला, परंतु लवकरच तो थांबवला. फिर्यादींनी मूळ रक्कम परत मागितली असता, ती शेअर बाजारात गुंतवल्याचे सांगून टाळाटाळ करण्यात आली. एक महिन्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने फिर्यादींनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनीही उत्तरे देणे टाळले. त्यानंतर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदर घटनेची तक्रार ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात करण्यात आली, मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे फिर्यादींनी आता महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ सह इतर कायद्यांतर्गत न्यायालयात फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती फिर्यादींनी केली आहे.

सोशल मीडियाच्या ओळखीचा गैरफायदा
अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव
अहिल्यानगर
सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखीचा गैरफायदा घेत शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवरधर्मांतर करण्याचा दबाव आणल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या मूळ तक्रारीत आता पोक्सो आणि विनयभंग यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
सोमवार दि. २४ नोव्हेंबर रोजी गंज बाजार परिसरातील जुना कापड बाजार रस्त्यावर राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरी संशयित अल्पवयीन मुलाने अनधिकृतपणे प्रवेश केला आणि मुलीकडे पैसे मागितले. पैसे दिले नाहीत तर वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या मुलीने वडिलांना माहिती दिली आणि त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला फक्त अनधिकृत प्रवेश व धमकावणे या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी पीडित मुलीचा सविस्तर जबाब घेतल्यावर संशयिताने सोशल मीडियावर ओळखीचा गैरफायदा घेतला. काही साथीदारांच्या मदतीने धर्मांतरासाठी दबाव आणल्याची माहिती उघडकीस आली आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरु असून, आरोपींचा तपास केला जात आहे.

दिव्यांग तरुणाची ३ लाखांची रोकड लुटली
अहिल्यानगर
दिव्यांग तरुणाला चाकूचा धाक दाखवून ३ लाखांची रोकड लुटली. सदरची घटना बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी समतानगर परिसरात घडली. याप्रकणी तोफखाना पोलीस ठाण्यात प्रदीप पंजाबी (रा. समतानगर, अहिल्यानगर ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रदीप पंजाबी यांचे पुतणे शिवम पंजाबी त्यांचे चालक भरत मालसमिंदर यांच्यासोबत एमआयडीसी परिसरातील राहुल वाईन्स येथून ३ लाख रुपये रोख रक्कम घेऊन चार चाकी वाहनाने येत होते. त्याचे चालक भाजी घेण्यासाठी समतानगर येथील अष्टविनायक अपार्टमेंटसमोर असलेल्या भगवती मेडिकलसमोर गेले. शिवम पंजाबी हे गाडीच्या आतच बसले होते. याच दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडला आणि शिवम यांना चाकूचा दाक दाखवून ३ लाख रुपये हिसकावले. शिवम हे शारीरिक अपंगत्वामुळे प्रतिकार करू शकले नाहीत. घटनेनंतर त्यांनी काका प्रदीप पंजाबी यांना माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद
अहिल्यानगर – लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ 12 तासांत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कुख्यात गुंड बबन घावटे यांच्यासह अन्य दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी कुख्यात गुंडाच्या टोळीकडून सोन्याचे नेकलेस, 5 मोबाईल, एक गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन असा एकूण पावणे आठ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे बबन भाऊसाहेब घावटे ( रा. राजापुर ता. श्रीगोंदा ), कृष्णा पोपट गायकवाड ( रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा ) अशी आहे.

फिर्यादी राजेंद्र नागरे (वय 54) हे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता आपल्या ज्वेलर्स दुकानात असताना ओळखीचा इसम बबन घावटे आणि त्याचे तीन साथीदार मारुती स्विफ्ट कारमधून दुकानात आले. फिर्यादीच्या चुलतभावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पैशांची मागणी करत आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी काचेच्या ट्रेमधून 5 सोन्याचे नेकलेस जबरदस्तीने नेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तपासासाठी दोन पथक रवाना केले. तपासादरम्यान, पथकाला गुन्ह्यातील आरोपी बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा रोडने चार चाकी वाहनाने येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा लावून गाडी अडवत आरोपीना अटक केली. बबन घावटे यास सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्यांने कृष्णा पोपट गायकवाड ( रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा ), संकेत जाधव रा. गोलेगाव ता.शिरुर, जि.पुणे (फरार), करण खरात (रा. हिंगणीता श्रीगोंदा ) यांच्यासमवेत गुन्हा केल्याची कबुली दिली. मुख्य आरोपी बबन घावटे हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या १० गुन्ह्यांची नोंद आहे. पुढील तपास लोणी पोलीस करत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोउपनि/ संदिप मुरकुटे, अनंत सालगुडे पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, दिपक घाटकर, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रमीझराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, मनोज साखरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिवसेनेच्या शुभांगी पोटे यांचा सार्‍यांनीच घेतला धसका; काय काय घडलं पहा

आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात शिवसेना...

कानठळ्या बसविणारे सायलेन्सर पोलिसांनी चालविला रोडरोलर, नेमकं काय केले पहा

पोलिसांनी १३० मॉडिफाइड सायलेन्सरवर चालविला रोडरोलर अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प...

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय; ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार, पण… , कोर्ट काय म्हणाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील...