मुंबई । नगर सहयाद्री:-
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोन्या-चांदीच्या दरांना चांगलीच झळाळी प्राप्त झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर सव्वा लाखाच्या टप्प्यावर पोहोचला असून, दररोज वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीपूर्वी नागरिकांना खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.
गुरुवार दि. ९ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २२० रूपयांची वाढ झाली असून, आता २४ कॅरेट १ तोळा सोन्यासाठी १,२४,१५० रूपये मोजावे लागत आहेत. १०० ग्रॅमसाठी हा दर १२,४१,५०० रूपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे.
१० ग्रॅमसाठी २०० रूपयांची वाढ होऊन, २२ कॅरेट १ तोळ्याचा दर आता १,१३,८०० रूपये झाला आहे. १० तोळ्यांसाठी ही किंमत ११,३८,००० रूपये इतकी झाली आहे. २४ आणि २२ कॅरेटसह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे.
१८ कॅरेट १ तोळा सोन्यासाठी आता ९३,११० रूपये मोजावे लागतात, तर १० तोळ्यांची किंमत ९,३१,१०० रूपये झाली आहे. फक्त सोन्याचेच नव्हे, तर चांदीचे दरही वाढले आहेत. १ ग्रॅम चांदीच्या दरात १ रूपयांची वाढ झाली असून, प्रति ग्रॅम दर आता १६१ रूपये झाला आहे.
एक किलो चांदीसाठी १,६१,००० रूपये मोजावे लागणार आहेत. दिवाळीच्या सणाला पारंपरिक पद्धतीने सोनं खरेदी करण्याकडे कल असतो. मात्र वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सोन्याचे दर अजून वाढतील की स्थिर राहतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.