निघोज । नगर सहयाद्री:-
पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार काढणारा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. पाच महिन्यानंतर हा वाद उफाळून आला असून दोन दिवसांपासून निघोज व परिसरातील हिंदू सकल समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. आज (दि.३) सकाळी मोठा जमाव मळगंगा मंदीरासमोर जमा झाला होता, दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने व सदर युवकाच्या कुटुंबाने माफी मागितल्यानंतर जमाव शांत झाला, व वादावर पडदा पडला.
अधिक माहिती अशी : एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार काढणारा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. याचा निषेध करण्यासाठी मळगंगा मंदीरासमोर सकाळी दहा वाजेपर्यंत मोठ्या संख्येने जमाव जमला होता. यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषना देत विविध हिंदू संघटनांनी वातावरण निर्माण केले होते.
पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी जमलेल्या जमावापुढे जाऊन सर्व परिस्थीती योग्य प्रकारे हाताळली. त्या युवकाच्या कुटुंबातील सदस्यांनी जमावापुढे येऊन माफी मागीतली. तसेच आम्हीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे असल्याचे सांगितले. पुन्हा अशी चूक होणार नाही अशी ग्वाही दिली. यानंतर वातावरण शांत झाले. यामध्ये पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी हस्तक्षेप करून शांततामय मार्गाने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.