अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीतील घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अनंत गर्जे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर अनंत हा फरार होता. त्यानंतर काल (रविवारी) रात्री १ वाजता त्याने वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर आज (सोमवारी) गौरी पालवे-गर्जे यांच्या पार्थिवावर अनंत गर्जे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोज देवढे या मूळगावी घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत डॉ. गौरी पालवे-गर्जेहिच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार व्हावेत, असा आग्रह धरला होता. यावरुन गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची देखील झाली. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ.गौरी पालवे-गर्जे यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून, येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
यावेळी गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांसमोर हात जोडत “जर तुम्हाला मुलगी असेल, तर मला न्याय द्या. श्रीमंताला मुलगी देऊ नका. त्यांच्या नादी लागू नका, गरिबाला मुलगी द्या, असे म्हणत टाहो फोडला. त्यांच्या या आक्रोशाने सगळेच जण सुन्न झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थीनंतर अनंत गर्जे यांच्या दारात अंत्यसंस्कार न करता घराच्या बाजूला सरण रचून डॉ. गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गौरीच्या आईवडिलांना हंबरडा फोडला.



