जालना / नगर सह्याद्री
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय सध्या गाजत आहे. उद्यासाठी मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय आहे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे आरक्षणासाठी अनेक मागण्या करत २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला होता व आता मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आता राष्ट्रपतींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये राष्ट्रपती मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहे. पण हे राष्ट्रपती म्हणजे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्हेत तर तर तीन वर्ष वयाचा मुलगा आहे व या मुलाचे नाव राष्ट्रपती आहे. हा धाराशिव जिल्ह्यातील असून या मुलाचे कौतूक होत आहे. राष्ट्रपती दत्ता चौधरी या मुलाचा जन्म 19 जून 2020 रोजी झाला असून त्याचे नाव राष्ट्रपती ठेवण्यावरून व त्याचे आधार कार्ड काढण्यावरून बरीच चर्चा झाली होती.
व्हिडिओत काय म्हणतात राष्ट्रपती दत्ता चौधरी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील तीन वर्षाच्या मुलाचे नाव राष्ट्रपती आहे. या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे मराठा समाजास आरक्षण देण्याची विनंती केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्यात तीन वर्षाचा राष्ट्रपती म्हणतो, ” नमस्कार, मी राष्ट्रपती बोलतो. सरकारला विनंती आहे. मराठ्यांना आरक्षण द्या. मोदी साहेब, शिंदे साहेब, फडवणीस साहेब, अजित दादा या सगळ्यांना विनंती आहे. मराठ्यांना आरक्षण द्या. सध्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. जय महाराष्ट्र”.