मुंबई / नगर सह्याद्री –
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला थेट इशारा दिला आहे.मनोज जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला असून 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं सांगितलं. सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत, असं म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
‘सरकारने ५ जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार.’ असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. तसंच, ‘कायद्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली. तिघांना शुभेच्छा आहेत. आमच्याकडून तिघांचं अभिनंदन. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नटकबाजी बंद करायची.’ असं जरांगे म्हणालेत.
तसंच, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असं सांगत समाजाला सांभाळायचं, शिकायचं, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही जनतेचं मन जिंकायचं काम करा.’ असं आवाहन मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला केलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय.
‘लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. समाज तुमचं अभिनंदन करेल. असं जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला उत्तर देताना सांगितलं. आम्ही आमच्या उपोषणावर ठाम असल्याचं सांगत आमचा समाज बरळवाडी करणाऱ्याला किंमत देत नाही.’ असं मनोज जरांगे यांनी सांगितले. राज्यामध्ये महायुतीचे सरकार येताच आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक झालेत.