Ahilyanagar Crime News : प्रेयसीला भेटायला गेला असता तिच्या नातेवाईकाने पाहिले व लाकडी दांडक्याने हातपाय व पाठीवर मारहाण करत जीवे मारून टाकल्याची घटना मंगळवारी (दि.5) पहाटे 5 वाजता पळसुंदे (ता.अकोले) येथे घडली आहे. नवनाथ तुकाराम पडवळे (वय 19, रा. पांगरी) असे मयत युवकाचे नाव असून नुकताच तो बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. याप्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक केली आहे.
याबाबत मयत नवनाथ पडवळे याचे वडील तुकाराम भावका पडवळे यांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचा मुलगा नवनाथ हा अकोलेेतील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे पळसुंदे गावातील एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याची माहिती दोन महिन्यांपूर्वी समजली होती. तेव्हा त्याला ‘तू शाळा शिक दुसरे कुटाणे करु नको’ असे समजावून सांगितले होते. त्यानंतर सोमवारी (दि.5)भागा महादू दिघे यांच्या मुलाचा साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम नागमळा सातेवाडी येथे असल्याने सर्वजण कार्यक्रमाला गेलो होतो.
कार्यक्रम संपल्यानंतर नवनाथ म्हणाला, की मी आपल्या घरी जातो मला मोटारसायकल द्या, तुम्ही व आई येथेच मुक्कामी थांबा असे सांगून रात्री 11.30 वाजता गाडीवर गेला. त्यानंतर तो मंगळवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास त्याचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीस भेटण्यास पळसुंदे येथे गेला असता तिथे त्याला योगेश यशवंत दुटे याने पाहिले व नवनाथला पकडून त्यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन त्याचा खून केला. यावरुन अकोले पोलिसांनी योगेश दुटे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.