पुणे । नगर सहयाद्री:-
ऐन गणेशोत्सवात पुण्यात धक्कादायक प्रकरणे उघडकीस येत आहे. आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या करून, तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या महिलेचे नाव असून विनायक आवळे असे आरोपीचे नाव आहे.
सदरची घटना घटना काल रात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान घडली. विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके उडाले होते, त्यानंतर रिक्षाचालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेम संबंध जुळले. गेली दोन वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आळवून हत्या केली. मग, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आणि तो पसार झाला. काहींना आज सकाळी रिक्षात शिवानी बसल्याचं दिसलं, पुढं ती मृत पावल्याचं लक्षात आलं. वाकड पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.
ही हत्या प्रियकर विनायकने केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेली आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दोन दिवसांपूर्वी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच अली अन्सारीची दगडाने ठेचून हत्या झाली होती. आता या महिलेचा गळा घोटण्यात आला. त्यामुळं ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.