मुंबई । नगर सहयाद्री
चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या केली आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.प्रियकराला महिलेच्या विश्वासघाताबद्दल शंका होती, त्यामुळे दोघांमध्ये भांडण झालं, आणि या भांडणादरम्यान प्रियकराचा राग अनावर झाला. त्यानं महिलेचा गळा आवळला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
आरोपी आणि महिला २०२० पासून रेड लाईट परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांचे वय ४०च्या आसपास आहे. महिला वेश्या व्यवसायात काम करत असल्याचं माहित असूनही दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपू्र्वी महिला दुसऱ्या पुरूषाच्या प्रेमात पडल्याचा संशय त्याला होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान, प्रियकरानं महिलेचा गळा आवळला. महिलेचा मृत्यू झाल्याचं समजताच आरोपीनं तेथून पळ काढला.
पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी वाशी येथून आरोपीला २ तासांत अटक केली आहे. मृत महिला मुळची पश्चिम बंगालची असल्याचं स्थानिकांनी सांगितले. पूर्वी ती पतीसोबत येथे राहायची आणि वेश्या व्यवसाय करून स्वतःचा संसार चालवायची. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर मृत महिला आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते आणि ती महिला आपला व्यवसायही करत होती.