पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील खडकवाडीतील रोकडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 3 रीत शिकणारी कु. ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा राहत्या घरी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. कु. ईश्वरी सदैव हसतमुख असणारी गुणी व हुशार मुलगी होती. तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी घेतली कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी याबाबत सरकाराकडे पाठपुरावा करून 10 लाख रुपये मदत मिळवुन देणार असल्याचे सांगितले. तसेच अनेक दिवसांपासुन पारनेर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तक्रार करुनही वन खाते मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे, याचे दुःख व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच शरद गागरे, शरद पाटील, शिवाजी शिंगोटे, सुभाष शिंदे, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, किसन आहेर आदीं उपस्थित होते. दरम्यान, या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत असून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. ज्यांची मुले, मुली गावाबाहेरील वस्तीवरून प्राथमिक, माध्यमिक शाळेत येतात त्या विद्याथ आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.