अहमदनगर | नगर सह्याद्री-
शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे १.४० लाख मालमत्तांचे घर टू घर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मे.सी.ई. इंन्फो सिस्टीम, नवी दिल्ली या संस्थेमार्फत हे काम सुरू असून प्रायोगिक तत्त्वावर शहर व सावेडी उपनगर परिसरातील दोनशे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाकडून घेतलेल्या मोजमापांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.
महापालिकेमार्फत यापूर्वी सन २००४-२००५ या आर्थिक वर्षात सर्वेक्षण, मूल्यांकन निश्चिती होऊन मालमता कर आकारणी करण्यात आली आहे. त्यानंतर काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील एका संस्थेमार्फत जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून काम सुरू झाले होते. मात्र, ते अर्धवट अवस्थेत बंद केले गेले. आता मालमत्तेची डिजीटल छायाचित्रे, जिओ टॅगींग तसेच डिजीटल उपकरणांद्वारे मोजमाप करण्यात येणार आहे. तसेच, संपूर्ण कर आकारणी प्रणालीचे संगणकीकरण केले जाणार आहे.
शहरातील सर्व जागा, इमारती, घरांचे सर्वेक्षण, जीआयएस मॅपिंग (घर टू घर), संगणकीकरण, मालमत्ता कर मुल्यनिर्धारण झोन निहाय व महानगरपालिका निर्देशित कर आकारणी वॉर्ड रचनेप्रमाणे क्रमांक देणे, स्थळपाहणी करुन आवश्यक माहिती संकलित करणे, मालमत्तांचे संगणकीकृत नकाशे काढणे, डिजिटल छायाचित्र काढून संगणक प्रणालीत जोडणे, जीआयएस आधारीत कर मूल्यांकन झोन नकाशा तयार करणे, संपूर्ण कामाचे संगणकीकरण व संगणकीकृत कर आकारणी करुन मालमत्ताधारकांची सुनावणी घेणे, संपूर्ण मालमत्तांचे मूल्यांकन प्रकरणे प्रारुप व अंतिम करमूल्यनिर्धारण यादी तयार करणे, वार्षिक देखभाल दुरुस्ती व साहित्य पुरवठा करणे आदी कामे संस्थेमार्फत होणार आहेत.
गेल्या काही दिवसांत संस्थेने सावेडी उपनगर व मध्य शहरातील दोनशे मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांची छायाचित्रे व मोजमापे घेतली आहेत. सर्वेक्षणात मोजमापांसह मालमत्ता निवासी आहे की व्यावसायिक, त्याचा वापर कशासाठी होत आहे, सध्याचे रहिवासी भाड्याने राहतात की मालक स्वतः राहतात, यापूर्वी किती कर भरला आहे आदी विविध मुद्द्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. मोजमापे घेतलेल्या दोनशे मालमत्तांच्या नोंदींची पडताळणी प्रशासन करणार आहे. त्यानंतर पुढील कामकाज सुरू होणार आहे.