मुंबईत पार पडली बैठक, शहरप्रमुख किरण काळे यांची माहिती
मुंबई / नगर सह्याद्री –
सुप्रीम कोर्टाने सूचना केल्या आहेत. कोणत्या ही क्षणी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे. शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबईत सेना भवन येथे पक्षाचे खासदार, आमदार, शिवसेना नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश ठाकरे यांनी दिल्याची माहिती शहरप्रमुख काळे यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना नेते खा संजय राऊत, माजी केंद्रीय मंत्री खा. अरविंद सावंत, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री दिवाकर रावते, आ. मिलिंद नार्वेकर, अहिल्यानगर संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे यांच्या सह जिल्ह्यातून शहरप्रमुख किरण काळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उपस्थित होते.
यावेळी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, किरण काळे यांनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा बुडत्या जहाजात तुम्ही उडी मारत आहात असे त्यांना लोक म्हणत होते. जहाजाला भागदाड पडले किंवा जास्तीची गर्दी जहाजावर झाली तर जहाज बुडते. पण ते जहाज कसे बुडू द्यायचे नाही हे मला चांगले माहित आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आगामी मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा.
जिल्ह्याची जबाबदारी संजय राऊतांकडे :
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूकीसाठी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नेते म्हणून खा. संजय राऊत यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या समवेत आ. अनिल परब, उपनेते सुहास सामंत, साजन पाचपुते यांच्यावर देखील जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.