मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर निकालाचा दिवस असणार आहे. यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.
या निवडणुकीला सामोरे जाताना विचित्र पद्धतीच्या युती बघायला मिळू शकतील असे सांगितले जात आहे. या निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे अशा सर्वच महत्वाच्या महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. आता महापालिका निवडणुकी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पर्यंत घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार निवडणुका दिलेल्या वेळेत पूर्ण करणे राज्य निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे. तसेच महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अंतिम टप्पा असणार आहेत. त्यामुळे या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असणार आहे.
कोकणातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदेसेना उद्धवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. कोल्हापूरात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आटपून घेतले जात आहेत.
‘या’ दिवसानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यातच पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरनंतर आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यातील राजकीय हालचालींना वेग प्राप्त होणार आहे.



