मुंबई | नगर सहयाद्री
लोकप्रिय लावणी कलाकार आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘टीप टीप बरसा पाणी’ या सुपरहिट गाण्यावर आधारित एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गौतमीने स्विमिंग पूलमध्ये धमाकेदार अदा सादर केल्या असून, चाहत्यांमध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे.
गौतमीचा हा डान्स व्हिडीओ अवघ्या काही तासांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तिच्या एक्सप्रेशन्स, डान्स मूव्ह्ज आणि सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी कमेंट्समधून “Queen of Dance”, “मराठमोळी माधुरी” अशा उपाध्या देखील दिल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या लहानशा गावातून आलेली गौतमी पाटीलने अगदी सामान्य परिस्थितीतून मनोरंजन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वडिलांच्या त्रासदायक वागणुकीमुळे कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करत गौतमीने आपली कारकीर्द ‘बॅकडान्सर’ म्हणून सुरू केली.
लावणी महोत्सवात पहिल्यांदा स्टेजवर सादर केलेल्या लावणीने तिच्या कलागुणांना पहिले व्यासपीठ मिळाले. त्यानंतर सोशल मीडियावर, विशेषतः TikTok आणि Instagram वर तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आणि तिला ओळख मिळू लागली. डान्स कार्यक्रमांमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गौतमीला आता सिनेमांमध्ये देखील संधी मिळू लागली आहे. तिने ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मराठी मालिकेत एक लावणी डान्सर म्हणून काम केले असून, यापुढेही तिला अभिनयाच्या संधी मिळाव्यात अशी तिची इच्छा आहे.
मात्र, अभिनय हे क्षेत्र तिच्यासाठी नवे आणि थोडे आव्हानात्मक असल्याचं तिने याआधी दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं आहे. ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर केलेल्या परफॉर्मन्समुळे गौतमी पाटील सध्या पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. तिच्या या नव्या व्हिडीओमुळे तिच्या लोकप्रियतेत अधिक भर पडली असून, महाराष्ट्रातील तरुणाईसह विविध वयोगटांतील प्रेक्षक तिच्या शैलीने मंत्रमुग्ध झाले आहेत.