अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबविले जात असतात, मात्र असे असतानाही शहराच्या विविध भागांत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहे
शहरातील काही नागरिक तसेच रात्रीच्या वेळेस व्यवसाय करणारे चायनीज, अंडाभुर्जी टपरी चालक तसेच फळ व भाजी व्यवसायिक कचरा थेट रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच कचरा मोकाट जनावरे, भटक्या श्वानांमार्फत रस्त्यावर पसरत आहे. यामुळे शहराचेही विद्रुपीकरण होऊ लागले असून आजुबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
शहरात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व शहर अस्वच्छ करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी शहराच्या विभागनिहाय एका पथकाची निर्मिती करण्याची गरज असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने कोणत्याच स्वरूपाची कारवाई होत नसल्याने याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहे.