कचरा संकलनाची व्यवस्था सुरळीत करा अन्यथा जन आंदोलन छेडणार – किरण काळे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
संपूर्ण शहराच्या कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. घंटागाड्या रस्त्यावरून गायब झाल्या आहेत. ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात, विशेषतः महिला भगिनींची घरामध्येच साठवाव्या लागणाऱ्या कचऱ्यामुळे मोठी कुचंबणा सुरू आहे. गाडी येत नाही त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे. आठ दिवसांत कचरा संकलनाची व्यवस्था सुरळीत करा, अशी जाहीर मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा नागरिकांमध्ये जात मनपा, सत्ताधारी यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्याचा इशारा काळेंनी दिला आहे.
सर्जेपुरा, गोकुळवाडी, रामवाडीसह प्रभाग १० आणि ५ मधील नागरिकांनी उपशहर प्रमुख सुनील भोसले यांच्याकडे मनपाच्या गलथान कारभाराबद्दल तक्रार मांडली होती. त्याची दखल घेत शहर प्रमुख काळे यांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. प्रभागातील दुरावस्थेची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी आपली कैफियत मांडली.
यावेळी जय नेटके, सुरज उघडे, कामगार सेना शहर प्रमुख गौरव ढोणे, शिवसेना सामाजिक न्याय आघाडीचे विकास भिंगारदिवे, अर्जुन उघडे, योगेश भोरे, अंकुश उघडे, अभिषेक उघडे, युवा सेना विधानसभा अधिकारी आनंद राठोड, उमेश भोरे, राहुल वाकोडे, विशाल नेटके, अझीम शेख, गुड्डू शेख, नाझीम शेख, इम्रान शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सुनील भोसले म्हणाले, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच आरोग्य धोक्यात आलं आहे. यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. जनतेला वेठीस धरले जात आहे. लोकांनी ज्या नगरसेवकांना निवडून दिलं ते तोंड दाखवायला तयार नाहीत. प्रभाग कार्यालयाच लक्ष नाही. नागरिकांनी तक्रारीसाठी फोन केला तर तो कोणी उचलत नाही. प्रशासनाचा हा गलथान कारभार शिवसेना खपवून घेणार नाही. यावेळी काळे यांनी, स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करत चांगलेच धारेवर धरले. नागरिकांच्या स्वच्छते बाबत असणाऱ्या तक्रारींचा पाढा यावेळी त्यांनी वाचला. तात्काळ स्वच्छता करण्याची सूचना केली.
अन्यथा स्वच्छता पुरस्कारांची होळी करू :
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन २०२४ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात अहिल्यानगरचा देशात पाचवा तर राज्यात चौथा क्रमांक आला आहे. भारत सरकारने वॉटर प्लस आणि कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन मनपाला दिले आहे. मनपाने हे पुरस्कार विकत घेतले आहेत काय ? आठ दिवसांत कचरा संकलन व्यवस्था सुरळीत झाली नाही, तर ठाकरे शिवसेना स्वच्छता पुरस्कारांची होळी करून मनपाचा निषेध करेल, असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने काळे यांनी दिला आहे.