Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाही कोयत्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर टोळक्याने पानटपरीतील वस्तूंची नासधूस करत रोख रक्कम व सोनसाखळी चोरून नेली. हा धक्कादायक प्रकार २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नान्नज (ता. जामखेड) येथील बाजारतळावर घडला. याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी जामखेड पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वैभव विजय साळवे (वय २९, रा. नान्नज) यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी रात्री ते आपल्या साईनाथ पानटपरीवर मित्र अभयराजे भोसले यांच्यासोबत बसले होते. यावेळी गावातील दिग्विजय सोनवणे तेथे येऊन अभयराजे यांच्याशी वाद घालू लागला. हा वाद मिटवण्यासाठी वैभव साळवे गेले असता, दिग्विजयने इतर नऊ जणांना फोन करून बोलावले.
थोड्याच वेळात यशदीप साळवे, अभिजित साळवे, सतिश साळवे, अरविंद भालेराव, सद्दाम पठाण, आदर्श साळवे हे सर्वजण हातात कोयता, लोखंडी गज, बांबू घेऊन घटनास्थळी आले आणि त्यांनी अभयराजे भोसले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये मध्यस्थी करत असलेल्या फिर्यादी वैभव साळवे यांच्यावरही हल्ला करण्यात आला.
अभिजित साळवे याने वैभव साळवे यांच्या पाठीवर कोयत्याने वार केला. अरविंद भालेराव याने मांडीवर कोयता मारला. आदर्श साळवे याने देखील पाठीवर कोयता मारला. सद्दाम पठाण याने खिशातील २,००० रुपये लंपास केले. सतिश साळवे याने गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. यानंतर आरोपींनी पानटपरीतील फ्रिज, मोबाईल आणि इतर वस्तूंची नासधूस केली. गल्ल्यातील ४,००० रुपयांची रोख रक्कम देखील चोरीस गेल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
या प्रकरणात जामखेड पोलिस ठाण्यात यशदीप साळवे, अभिजित साळवे, सतिश साळवे, आदर्श साळवे, अरविंद भालेराव, सद्दाम पठाण, दिग्विजय सोनवणे, रतन साळवे, सुनिल साळवे, शिवाणी साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या सर्व आरोपी फरार आहे.