अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहर व भिंगार कॅम्प भागात मागील काही दिवसांत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात एकूण चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून दोन पसार संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. केवळकुमार भगवानदास गांधी (वय 57, रा. सारसनगर, अहिल्यानगर) हे 3 जुलै रोजी बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. याप्रकरणी त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यासह अहिल्यानगर शहरात उघड न झालेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तपासात गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथून कैलास चिंतामण मोरे (44) व जयप्रकाश राजाराम यादव (38) यांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्यांनी विरेंद्रसिंग रामकेवलसिंग ठाकुर (रा. हाथगवा, ता. पुंडा, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) व सोपान पाटील (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वणी, ता. जि. धुळे) यांच्या मदतीने अहिल्यानगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. चोरीच्या दागिन्याबाबत ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे चौकशी केली असता चोरी केलेले दागिने रवींद्र आनंद माळी (42 रा. शिरपूर, जि. धुळे) आणि सुनील ईश्वर सोनार (35 रा. बालाजीनगर, शिंगावे, ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्याकडे विकल्याची माहिती दिल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या दागिन्यांची विक्री पुढे सागर प्रकाश जगदाळे (रा. आंबेडकर रस्ता, शिरपूर, जि. धुळे) या सुवर्णकाराकडे झाल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली. तपास पथकात उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार शाहीद शेख, गणेश धोत्रे, गणेश लोंढे, अरूण गांगुर्डे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, अशोक लिपणे, विशाल तनपुरे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, महादेव भांड, भगवान धुळे आदींचा समावेश होता.
चार गुन्ह्यांची उकल
केवळकुमार गांधी यांच्या घरफोडीसह तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तीन घरफोडीची कबूली अटकेतील संशयित आरोपींनी दिली आहे. यामुळे चार गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. संशयित चार आरोपींना पुढील तपासकामी भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.