दोन आरोपींसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त । स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. टोळीकडून तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. टोळीचा मोहरक्या महेश शिरसाठ आणि गौरव शिरसाठ या दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक किरणकुमार कबाडी उपस्थित होते.
अधिक माहिती अशी: १७ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास फिर्यादी धर्मनाथ जोहरे (रा. गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) हे नेवासा फाटा येथे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होते. त्यावेळी एका स्विफ्ट कारमधील इसमांनी तुम्हाला सोडतो असे सांगून त्यांना कारमध्ये बसवले. नंतर चाकूचा धाक दाखवून फिर्यादीला मारहाण करत रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल आणि घड्याळ हिसकावले आणि त्यांना रस्त्यावर उतरवून दिले.
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सुरू केला. पथकाने घटनास्थळी भेट देवुन फिर्यादीकडुन आरोपींचे वर्णन प्राप्त करुन तसेच सीसीटीव्ही फुटेज, आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केल्यानंतर सदरचा गुन्हा हा महेश शिरसाठ (रा. म्हसले, ता. नेवासा ) याने एका साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.
गुप्त माहितीनुसार आरोपी कारने भेंडा येथुन नेवासा फाटा कडे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने नागापूर फाटा कमानीजवळ सापळा रचला तेथे आरोपींच्या स्विफ्ट कारला अडवत, महेश शिरसाठ (वय २६, रा. म्हसले) आणि गौरव शिरसाठ (वय २५) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम, चाकू, गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नेवासा तालुक्यात एक जबरी गुन्ह्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास नेवासा पोलीस करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाट, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड यांनी केली आहे.