श्रीरामपूर । नगर सहयाद्री
श्रीरामपूर शहरातील बाजारतळ वॉर्ड क्र. 3 मधील एका घरात सुरू असलेल्या बनावट दारू कारखान्यावर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. या छाप्यात 79,970 रुपये किमतीचा बनावट विदेशी दारूचा साठा आणि उत्पादन साहित्य जप्त करण्यात आले असून, तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बाजारतळ वॉर्डातील एका घरात दारू बनवण्याचे काम सुरू असल्याची खबर मिळाल्यावर पथकाने त्वरित छापा टाकला. यावेळी मनोज भाऊसाहेब पवार, शुभम पवार आणि हिराबाई पवार हे तिघे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर बनावट विदेशी दारू आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. चौकशीत आरोपींनी बनावट दारूसाठी लागणारा मद्यार्क राहुल बाळू फुलारे (रा. लोंढे मळा, खबडी जवळ) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली.
त्यानंतर फुलारेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 160 लिटर शुद्ध मद्यार्क सापडला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच राहुल फुलारे फरार झाला. त्याच्या वडिलांना – बाळू फुलारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या संपूर्ण कारवाईत 79,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील बनावट दारूच्या धंद्याला या कारवाईमुळे मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.