अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
गुटख्याची वाहतूक करणार्या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कारवाई करत 5 लाख 54 हजार 885 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुगंधीत तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधीक्षक घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
त्यानुसार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली 5 जुलै रोजी कर्जत पोलीस ठाणे हद्दीत गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली. राशिन-भिगवण रस्त्यावरून कारमधून गुटखा वाहून नेला जात आहे, अशी माहिती पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच तातडीने सापळा रचण्यात आला. संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधीत तंबाखू, गुटखा व पानमसाल्याचे गोणी व बॉक्स आढळून आले.
संभाजी शिवाजी सरक (वय 35, रा. मदनवाडी, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे), अमर अनिल कांबळे (वय 35, रा. आंबेडकर नगर, राशिन, ता. कर्जत) व भाऊसाहेब किसन सकुंडे (वय 27, रा. मदनवाडी, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी अधीक्षक घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक खाडे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.