अहमदनगर / नगर सह्याद्री –
गणपती विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. गणपती विसर्जना दरम्यान 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव इथं ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरुन तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृत युवकांची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.
नाशिकमध्ये दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू
नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी पाण्यात उतरले असता दोघेही एका खड्ड्यात पडले. मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिकच्या पार्थर्डी फाटा परिसरात ही घटना घडली. घरातील तरुण मुलांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून दोघेही जिवलग मित्र होती. ओंकार हा केटीएचएम महाविद्यालयात शिकत होता. तर, स्वयंम हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. ओंकार आणि स्वयंम काल संध्याकाळी मित्रांसोबत वालदेवी नदीत गणपती विसर्जनासाठी गेले. त्यावेळी नदीपात्रातील एका खड्ड्यात ते पडले. पाण्यातून बाहेर येता न आल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
अमरावती जिल्ह्यात तीन तरुण गणेशभक्तावर काळाचा घाला
गणपती विसर्जना दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तीन तरुण गणेशभक्तावर काळाने घाला घातला. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील पूर्णा नदीत अचलपूर तालुक्यातील 2 युवक तर दर्यापूर तालुक्यातील 1 युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. नदीत वाहून गेलेल्या गणेश भक्तांचा सध्या शोध सुरू आहे. मयूर गजानन ठाकरे (वय 28), अमोल विनायक ठाकरे (वय 40, राहणार ईसापुर) आणि दारापूर येथील राजेश पवार असे वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत.