पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह जादा परताव्याचे आमिष दाखवून सिस्पे कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले. परंतु या कंपनीने सुप्यातून आपला गाशा गुंडाळला असून या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पारनेर तहसील कार्यालयासमोर बाबा अप्पा दरोडे (रा. उखलगाव ता. श्रीगोंदा) इतर काही गुंतवणूकदार यांनी पारनेर तहसील कार्यालय समोर 15 सप्टेंबरपासून अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे.
तर या उपोषणकर्त्यांची भाजपाचे मंडलाधिकारी राहुल शिंदे, सरपंच पंकज कारखिले यांनी भेट घेत पाठिंबा व्यक्त केला आहे. या निवेदनावर बाबा आप्पा दरोडे, अनिल बबनराव पाचरे, दत्तात्रय बाळकृष्ण साबळे, नितीन भास्कर शेळके, रेणुका रवींद्र नवले आदीं उपोषणकर्त्यांच्या सह्या आहेत. यासबंधीचे निवेदनही त्यांनी पारनेरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
आम्ही सांगतो त्या ठिकाणी विविध कंपन्यात गुंतवणूक केल्यास चांगला आर्थिक फायदा होईल अशी खात्री देऊन त्यांना झालेल्या फायद्याचा ताळेबंद दाखून आमचा विश्वास संपादन करून मोठी गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक केली मात्र आता गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत नाही.
पोलिसांना आरोपी सापडेना?
सिस्पे व ईन्फिनाइट मल्टिस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना दामदुप्पट व जादा परताव्याचे आमिष दाखवून 1 हजार कोटी रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी नवनाथ औताडे सह इतर 14 जणांवर व गाडिलकर बंधुवर व कुटुंबीयांवर श्रीगोंदा, नगर, पारनेर तालुक्यात गुन्हे दाखल झाले आहे. परंतु आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने सुपा येथून विक्रम बबन गाडीलकर यास अटक केली असून त्याला 24 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.