संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
मुंबई | नगर सह्याद्री
स्व. गुलाबराव शेळके हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या मुंबईतील जी. एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुंबईचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नितीन काळे यांनी मंगळवारी जाहीर केला. कार्यक्रमानुसार बुधवार 23 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून रविवार 01 जून 2025 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
पारनेर तालुक्यातील मुंबईस्थित विशेषतः व्यावसायिकांना एकत्र करून सॉलिसिटर स्व. गुलाबराव शेळके यांनी या बँकेचे रोपटे लावले. सुरूवातीपासून स्व. शेळके यांचेच या बँकेवर वर्चस्व राहिले. पुढे स्व. गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर बँकेची सूत्रे त्यांचे चिरंजीव स्व. ॲड. उदय शेळके यांच्याकडे आली. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली पहिलीच निवडणूक बिनविरोध करण्याची किमया करून दाखविली.
एकूण 19 संचालकांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार असून त्यात सर्वसाधारण प्रवर्गातील 14, महिला प्रतिनिधी 02, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी 01, इतर मागासवगय प्रतिनिधी 01, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी 01 यांचा समावेश आहे. बुधवार 23 एप्रिल ते मंगळवार 29 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. प्रत्येक दिवशी दुपारी चार वाजता दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नामनिर्देशन पत्रांची छाननी व अर्ज मागे घेण्याचा दिनांक
मंगळवार 29 एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्यानंतर बुधवार 30 एप्रिल रोजी निवडणूक कार्यालयात दुपारी तीन वाजता त्यांची छाननी करण्यात येईल. शुक्रवार 02 मे रोजी दुपारी 01 वाजता निवडणूक कार्यालयात वैध नामनिर्देशन पत्रांची सुची प्रसिद्ध करण्यात येईल. शुक्रवार 02 मे ते शुक्रवार 16 मे दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत दाखल नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील. सोमवार 19 मे रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निशाणी वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन दुपारी एक वाजता करण्यात येईल.
मतदान 1 जृन रोजी
रविवार 01 जून रोजी 19 संचालक निवडण्यासाठी मतदान घेण्यात येईल. मतदान केंद्रांची सूची निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार असून सोमवार 02 जून रोजी सकाळी 09 वाजल्यापासून मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.