सुपा । नगर सहयाद्री:-
मुलगी पहावयास चाललेल्या भावी नवरदेवाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना वाडेगव्हाण (ता. पारनेर) शिवारात घडली. पवन उत्तम चव्हाण (रा.चोरपांधरा ता.लोणार जि.बुलढाणा ) असे मयत युवकाचे नाव आहे. तर मित्र सूरज प्रकाश राठोड (रा.जांभोरा ता.सिंदखेडराजा जि.बुलढाणा ) जखमी झाला आहे.
मंगळावर दि. ११ मार्च रोजी पवन चव्हाण मित्र सूरज राठोड मुलगी पाहण्यासाठी दुचाकीवरून लोणीकंद येथून अहिल्यानगर मार्गे निघाले होते. पारनेर वाडेगव्हाण शिवारात त्यांच्या दुचाकीला लक्झरी बसने कट मारल्याने दोघे दुचाकीसह रस्त्यावर असलेलया डीव्हायडरवर आदळले. दरम्यान, पवन चव्हाण यांच्या शरीरावरुन भरधाव पिकअप गेल्याने पवन गंभीर जखमी झाला.
रस्त्यावरील प्रवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सूरज व जखमी पवन यांना सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पवन उत्तम चव्हाण याचा मृत्य झाला. सुपा पोलिस ठाण्यात अज्ञात लक्झरी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस करत आहेत.