आयुक्त यशवंत डांगे यांची माहिती / आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहरातील अमरधाम स्मशानभूमीच्या विकासासाठी व सुशोभीकरणासाठी शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी ७ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीस नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात शहरातील प्रमुख रस्त्यांचे कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे नगरकरांचा दैनंदिन प्रवास हळूहळू सुखकर होत आहे. जसा हा प्रवास सुखकर होत आहे तसाच आता अमरधामच्या सुशोभीकरणामुळे आता नगरकरांचा मृत्यूनंतरचा अंतिम प्रवासही सुखकर होणार आहे. कायम रुक्ष वातवरण असलेल्या अमरधाम मध्ये सुशोभीकरण होणार असल्याने नागरिकांना चांगल्या सुविधांमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
अहिल्यानगर मधील नालेगाव भागातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीये. तेथील असुविधांमुळे नागरिकांना अंत्यसंस्कारा वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार जगताप यांनी महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून अमरधाममध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने ३१ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या महासभेत हा विषय घेऊन ठराव केला होता व जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवला होता.
या ठरावास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकतीच परवानगी दिली असून अहिल्यानगर मधील अमरधाम स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी व विकासासाठी तब्बल ७ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबरोबर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हद्दीतील दौंड रोडवरील महादेवनगर भागात नवे विद्युत रोहित्र बसवण्यासाठीही सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत ७ लाख ४१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मार्च २०२६ पर्यंत सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.