संगमनेर । नगर सहयाद्री:-
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे राज्याच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत असतो. गडकिल्ल्यांप्रमाणेच संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेले ‘बारवास’ स्मारकांचा दर्जा देऊन डागडुजी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन केली आहे. गड-किल्ले तसेच प्राचीन स्मारके व वास्तू संवर्धनबाबत काही सूचना सुचविण्यासाठी आ. तांबेंनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केल्याच्या, वास्तूंचे नुकसान केल्याचे प्रकार राज्यात घडत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाद्वारे करण्यात आलेल्या शिक्षेची तरतूद स्वागतार्ह आहे. परंतु गड किल्ल्याच्या ठिकाणी चुकीचे वर्तन करणाऱ्यांना शिक्षा आणखी कठोर करण्यात यावी. तसेच गड किल्ले व पुरातन वास्तूंच्या ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांना शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे आ. तांबेंनी केली आहे.
गड किल्ले व पुरातन वास्तूंच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीमध्ये वन विभाग कर्मचारी, स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधी, पुरातत्व खात्याचे प्रतिनिधी असतात. या प्रतिनिधी बरोबरच गडकिल्ले संवर्धनाचे काम करणारे व्यक्ती व संस्था यांच्या प्रतिनिधींना देखील समितीमध्ये स्थान देण्यात यावे. तसेच नाशिक येथे कुंभमेळा होणार असून अहिल्यानगर आणि नाशिक हा दंडकारण्याचा परिसर आहे. या दोन्ही जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. कुंभमेळा निमित्त अनेक भाविक आणि पर्यटक नाशिक येथे असतात त्यामुळे या परिसरातील प्राचीन स्मारकांच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी.
महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत. गड किल्ले हेच छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके आहेत. या गडकिल्ल्यांमध्ये शाळांच्या सहली काढण्यासाठी सरकारने प्रोत्साहन देण्यात यावे आणि त्याचबरोबर गड किल्ले पर्यटनाचे सर्किट करून वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिल्यास कुंभमेळ्या निमित्त महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना गड किल्ले पर्यटनाची मोठी संधी मिळू शकते.
अनुभव असणाऱ्याला कंपनीला काम देणे
अनेक वेळा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम अनुभव नसणाऱ्या आर्किटेक्टला दिले जाते. अनेक वर्ष उभी असलेली स्मारके तशीच राहतात, परंतु अनुभव नसणाऱ्या व्यक्तीला काही वर्षातच ते काम खराब होते. त्यामुळे गड किल्ले व पुरातन स्मारकांच्या ठिकाणी करण्यात येणारी दुरुस्तीची अथवा सुशोभीकरणाची कामे दर्जेदार होण्यासाठी अनुभवी आर्किटेक्ट यांना देण्यात यावीत अशी मागणी आ. तांबेंनी केली.



