अहिल्यानगर । नगर सहयाद्री
दुचाकी आडवी लावण्याच्या वादातून मित्रांनी मित्रावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री निलक्रांती चौकाजवळील हनुमान पान शॉपजवळ घडली. घटनेत अभिषेक साखरे आणि चेतन बनसोडे (रा, दातरंगे मळा, अहिल्यानगर) जखमी झाले आहे.
अभिषेक साखरे व चेतन बनसोडे रात्री ९ वाजता मित्रांसोबत गप्पा मारत होते. त्यानंतर ते पान खाण्यासाठी हनुमान पान शॉपवर आले. तेथे ऋतीक साळवेने त्यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावली. त्यानंतर त्याच्यात वाद सुरु झाले. तेवढ्यात अमोल पाडळे, अक्षय पवार, रुपेश गायकवाड आणि निखील साळवे धावत आले. पाचही जणांनी अभिषेक आणि चेतनला लोखंडी रॉडने मारहाण केली.
अभिषेकने चेतनला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी चेतनच्या डोळ्याजवळ आणि डोक्यावर वार केले. चेतन बेशुद्ध पडला, अभिषेकने मित्र पियुष उंबरवालला फोन करून घटना सांगितली. पियुष आणि अभिजीत आल्हाट यांनी चेतनला तात्काळ सिव्हील हॉस्पिटलला दाखल केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकणी पोलिसांनी अमोल पाडळे, ऋतीक साळवे, अक्षय पवार, रुपेश गायकवाड आणि निखील साळवे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, तिघे फरार आहेत. हे सर्व निलक्रांती चौकाजवळ राहणारे असून ऋतीकचे मित्र आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.