अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून, उत्पादन ठप्प होणे, मशीनरी डाऊनटाईम, कर्मचारी व्यवस्थापनातील अडचणी अशा अनेक समस्यांना उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे. उद्योजकांच्या या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आमी संघटना आणि महावितरण विभागाचे अधिकारी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.
आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी बैठकीत एमआयडीसीतील उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी मांडल्या. विशेषतः डी.एफ.ए. आणि एल ब्लॉकमध्ये विजेचा पुरवठा खंडित होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे उद्योगधंद्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. खाकाळ म्हणाले की, एमआयडीसीत विजेची मागणी झपाट्याने वाढत असताना विद्यमान वितरण यंत्रणा पुरेशी नाही. उद्योगांचे नुकसान थांबवायचे असेल तर एमआयडीसीमध्ये नवीन सबस्टेशन उभारणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
अहिल्यानगर मंडलाचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी सांगितले की, विजेचा वाढलेला भार हा खंडित पुरवठ्याचा मुख्य कारण आहे. एकाच लाईनवर जादा लोड आल्यामुळे पुरवठा खंडित होतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. उद्योगांनी काही दिवस धीर धरणे आवश्यक आहे. महावितरणमार्फत विजेची क्षमता वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेक उद्योजकांमध्ये नवीन आलेल्या स्मार्ट मीटर संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. या गैरसमजाला दूर करण्यासाठी महावितरणने स्मार्ट मीटर आणि जुने मीटर एकत्र लावून प्रत्यक्ष रीडिंग तुलना प्रात्यक्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना 85 पैसे प्रति युनिट रिबेट मिळणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापारेषण विभागाकडून एमआयडीसी परिसरातील पारेषण लाईन अपग्रेड करण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मिलिंद भामरे यांनी दिली. त्यामुळे पुढील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वीज क्षमता वाढणार असून वीजखंडीत समस्यांमध्ये लक्षणीय घट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, महेश इंदानी, प्रफुल्ल पारेख, रोहन गांधी, सुमित सोनवणे, सुहास भिंगारे, राहुल कराळे, राजेंद्र शुक्रे, निनाद टिपूगडे, सागर निंबाळकर, स्वप्नील पारेख तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता मंगेश साळुंके, योगेश चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत व सुनिल राहिंज उपस्थित होते.



