अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली साई सोनल अपार्टमेंट, तपोवन रोड येथील अर्जुन लक्ष्मण गिते (वय ३६) यांची २५.५ लाखांची आणि इतर तिघांची २५ लाख अशी एकूण ५०.५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अर्जुन यांनी विशाल तुकाराम चव्हाण आणि कृष्णा दगडू शिंदे यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अर्जुन गिते, जिल्हा न्यायालयात लघुलेखक, यांची २०२२ मध्ये विशाल चव्हाण (रा. गोपाल धाम सोसायटी, सावेडी) आणि त्याची पत्नी शीतल उर्फ पूजा चव्हाण यांच्याशी ओळख झाली. विशाल याने व्ही.सी. इन्व्हेस्टमेंट नावाने शेअर मार्केट कंपनी सुरू केल्याचे सांगून ३०-४०% नफ्याचे आमिष दाखवले. त्याने इन्स्टाग्राम, फेसबुकवर नफ्याचे व्हिडीओ दाखवून अर्जुन यांच्यासह स्नेहा जोशी, शीतल चव्हाण, आनंद जोशी आणि अजिनाथ पाडळकर यांचा विश्वास संपादन केला. अर्जुन यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ मध्ये २५.५ लाख रुपये गुंतवले. विशालने १०% परताव्याचे आश्वासन दिले, परंतु फेब्रुवारी २०२५ नंतर परतावा थांबला.
रक्कम परत मागितल्यावर विशालने शेअर मार्केटमधील मंदीचे कारण सांगून टाळाटाळ केली. त्याने मार्च २०२५ मध्ये नोटरी करारनामा केला, परंतु रक्कम परत केली नाही. कृष्णा शिंदे यांनी निंबोडी येथील प्लॉट विक्रीचे आमिष दाखवले, तरीही पैसे परत मिळाले नाही. कृष्णाने विशालने ४०-५० गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे सांगितले. तोफखाना पोलीस ठाण्यात मपोना खुडे यांनी फिर्याद दाखल केली असून, सपोनि वारुळे तपास करत आहेत.