अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
नगरमध्ये क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली अमेरिकेतील मिधुला कडियाला यांची 14.18 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अभिजित संजय वाघमारे (रा. विराज कॉलनी, अहिल्यानगर) याला आंध्रप्रदेश सीआयडी आणि तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले. आंध्रप्रदेशात याप्रकरणी गुन्हा दाखल असून, यापूव तिघांना अटक झाली आहे. फसवणुकीची रक्कम वाघमारे याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे तपासात उघड झाले.
मिधुला कडियाला यांच्या वडिलांनी, मुरली मनोहर कडियाला यांनी, आंध्रप्रदेश पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आंध्रप्रदेश सीआयडीचे पोलीस निरीक्षक डी. कासी विश्वनाध यांनी सांगितले की, तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम वाघमारे याच्या खात्यात आल्याचे समोर आले. यानंतर सीआयडीने तोफखाना पोलिसांच्या सहकार्याने अहिल्यानगरमध्ये येऊन वाघमारे याला ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात वाघमारे याने रक्कम आणि बँक खात्याबाबत माहिती नसल्याचा दावा केला आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्याला ट्रान्झिट कस्टडीसाठी 6 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी अहिल्यानगर न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचा तपास आंध्रप्रदेश सीआयडीमार्फत सुरू असून पुढील कारवाईसाठी वाघमारे याला आंध्रप्रदेशात नेण्यात येणार आहे.