जामखेड । नगर सहयाद्री :-
येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, आणि इतर अधिकारी व संचालक यांच्यासह 19 जणांवर ठेवीदारांची 1 कोटी 10 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 आणि भारतीय न्याय संहिता बिएनएस 2023 अंतर्गत करण्यात आली आहे.
फिर्यादी नितीन राघाजी राजपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2022 मध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या जामखेड शाखेतील अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांची पत्नी संचालक अर्चना कुटे आणि इतरांनी जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांचे पैसे आकर्षित केले. त्यांनी वारंवार संपर्क साधून फिक्स डिपॉझिट करण्यास प्रवृत्त केले, ज्यामध्ये राजपुरे आणि त्यांच्या वडिलांनी एकूण दहा लाख अठरा हजार रुपयांची रक्कम ठेवली होती.
संस्थेच्या शाखेचे 11 ऑक्टोबर 2023 रोजी अचानक बंद झाल्यामुळे ठेवीदारांमध्ये घबराट निर्माण झाली. शाखा व्यवस्थापक सचिन खांडे यांनी तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचे सांगितले, परंतु ठेवीदारांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खोटे आश्वासन देऊन बॅंक पुन्हा चालू करण्याचे सांगितले.
तपासादरम्यान, ठेवीदारांचे पैसे वैयक्तिक वापरासाठी प्रॉपर्टी, शेअर बाजार, ट्रान्सपोर्ट कंपनी, तिरूमला ऑईल आणि इतर व्यवसायांमध्ये गुंतवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पीडितांमध्ये प्रमोद राऊत, प्रविण सानप, महारुद्र नागरगोजे, अरूण सुतार, ऋषिकेश डुचे, आणि उदयकुमार दहातोंडे यांचा समावेश असून, एकूण फसवणूक रक्कम 1 कोटी 10 लाख 68 हजार रुपये इतकी आहे.
याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, संचालक अर्चना कुटे, अशिश पाटोदेकर, वसंत सटाले, वैभव कुलकर्णी, कैलास मोहीते, शिवाजी पारसकर, रवींद्र तांबे, रेखा सटाले, रघुनाथ खरसाळे, रवींद्र यादव, सुशील हाडुळे, सचिन खांडे सर्व राहणार बीड, आशा पाटील रा.सोलापूर, नारायण शिंदे रा. अंबड जिल्हा जालना, दादाराव उंदरे रा. वाशी जिल्हा धाराशिव, कल्याण गोरे पाटोदा जि. बीड, राजेंद्र पोकळे रा. अमळनेर ता. शिरूर, जि. बीड अशा 19 जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.