श्रीगोंदा ।नगर सहयाद्री: –
पायी दिंडी वारीसाठी शासनाकडून पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या निधीत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी केला असून या मागणीसाठी त्यांनी श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
दिंडी वारीनंतर १५ ते २० दिवसांत ग्रामपंचायतींनी खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक असताना, एकाही ग्रामपंचायतीने तो हिशोब सादर न केल्याने आर्थिक अपारदर्शकतेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात दिनांक ३ ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडने निवेदन दिले होते, तसेच ११ ऑगस्ट रोजी गजर आंदोलनही करण्यात आले.
मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे स्पष्ट केले. या आंदोलनाला संत नामदेव-तुकाराम वारकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली होरे, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज, प्रफुल्ल उर्फ बापु जगताप, सुयोग धस, संदिप जगताप, सद्दाम शेख, पांडुरंग खोरे, संतोष आरडे मेजर आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभला आहे.
पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी थोरात साहेब, मुकुंद पाटील, विस्तार अधिकारी यादव व हराळ मॅडम यांनी आंदोलकांशी चर्चा करून दोन ग्रामपंचायतींचा खर्चाचा तपशील सादर केला. तसेच उर्वरित ग्रामपंचायतींचे हिशोब लवकरात लवकर सादर करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.यानंतर उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे शामभाऊ जरे यांनी जाहीर केले.