Accident News: पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची भयंकर घटना घडली आहे. कार्यक्रमानिम्मित आलेल्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृणालिनी अजय बेसरकर (38), आशालता हरिहर पोपळघट (65), अमोघ बेसरकर (सहा महिने), दुर्गा सागर गीते (7) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अजय अंबादास बेसरकर (40), शुभांगिनी सागर गीते (35) या जखमी झाल्या आहेत.
अधिक माहिती अशी: अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ ही घटना घडली.
दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून कुटुंब पुण्याकडे जात असताना ही हृदयद्रावक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले. ही धडक इतकी भयंकर होती की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर ४ वाहने एकमेकांवर आदळली
अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल येथे शनिवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेली ४ वाहने एकमेकांवर आदळली. यातील दोन ट्रक थेट दुकानात घुसले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांसह दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात इतका भीषण होता, की चारही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे.