माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव; देशभरातील 17 आजी-माजी कुलगुरुंची राहणार उपस्थिती / “कुलगुरू” व “शिक्षण आणि विकास” या ग्रंथांचे होणार प्रकाशन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व आणि 44 वर्ष प्रदीर्घ योगदान देणारे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती व गणित विभाग माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात सकाळी 10 वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. सर्जेराव निमसे यांचा शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे संस्थापक कुलगुरू डॉ.एन. के. ठाकरे असतील. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी डॉ. निमसे यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्य, संशोधन , नेतृत्वगुण, आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेल्या कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. सर्जेराव निमसे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा प्रा. गणेश भगत संपादित “कुलगुरू” गौरव ग्रंथ तसेच डॉ. सर्जेराव निमसे व प्रा. गणेश भगत संपादित शैक्षणिक ग्रंथ “शिक्षण आणि विकास” या दोन ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
हे दोन्ही ग्रंथ शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरतील. डॉ. सर्जेराव निमसे यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. संशोधनाला प्रोत्साहन दिले आणि शिक्षणक्षेत्रात नवचैतन्य आणले. त्यांच्या कार्याचा गौरव हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार असल्याची भावना त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉ. निमसे सरांच्या माजी विद्यार्थ्यांनी केले आहे. डॉ. निमसे यांनी आपल्या कारकिर्दीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड तसेच लखनौ विद्यापीठ या दोन्ही प्रतिष्ठित विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे. त्याचबरोबर इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्षपद ही भूषवले आहे तसेच पुणे विद्यापीठाच्या विविध पदावर व समित्यांवर त्यांनी प्रभावीपणे कार्य केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी घडले आहेत , संशोधक आणि शिक्षक वर्ग प्रेरित झालेले आहे. या अमृत महोत्सव सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी आणि सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या स्थळावर पोहोचण्यासाठी नगर-पुणे महामार्गावर काम सुरू असल्याने, उपस्थितांना मार्केटयार्ड येथील महात्मा फुले चौकातून सहकार सभागृहाकडे येता येणार असल्याचे म्हंटले आहे.
देशभरातील 17 आजी-माजी कुलगुरुंची उपस्थिती
माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी डॉ. अशोक कोळसकर, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. एन.जे. पवार, डॉ. वासुदेव गाडे, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. उद्धव भोसले, डॉ. भरत कुमार आहुजा, डॉ. जयंत वैंशपायन, डॉ. अरविंद दीक्षित, डॉ. मनोज दीक्षित, डॉ. अनिल शुक्ला, डॉ. उपेंद्र द्विवेदी, डॉ. मनोहर चासकर, डॉ. के.बी. पाटील, डॉ. ज्ञानदेव म्हस्के.



