राहुरी। नगर सहयाद्री
राहुरी शहराचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून विस्कळीत आहे. नवीन पाईपलाईनच्या कामामुळे दिवसाआड पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी होत आहे. राहुरी शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून भाजप पदाधिकार्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरेंना घेराव घातला, तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नगरपालिका कार्यालयात जात पाईपलाईनचे काम करणार्या ठेकेदाराची कानउघडणी केली. दोन दिवसांत पाईपलाईनचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने यावेळी दिले.
राहुरी शहराचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून विस्कळीत आहे. नवीन पाईपलाईनच्या कामामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी भाजप शहरातील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना घेराव घालत जाब विचारला. भाजपचे शहराध्यक्ष भैय्या शेळके, प्रकाश पारख यांच्या नेतृत्वाखाली गेलेले शिष्टमंडळ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात चांगलेच आक्रमक झाले.
राहुरी नगरपालिकेच्या मुळानगर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नवीन काम चालू असल्याने राहुरी शहराला एक महिन्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. प्रत्यक्षात काम पंधरा दिवसात पूर्ण होईल. पण महिनाभर एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा तातडीने सुरळीत व्हावा, यासाठी आंदोलन करण्यात आले.