अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या अध्यक्षपदावर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची आज (सोमवार) बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. कर्डिले यांनी अध्यक्षपदाच्या माध्यमातून बँकेच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा बँक आणि जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.

सहकारी क्षेत्रातील जाणकार आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर घुले पाटील हे यापूर्वीही बँकेच्या कारभारात सक्रिय राहिले आहेत. आज झालेल्या विशेष बैठकीत अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि त्यांची निवड बिनविरोध झाली. बँकेसमोरील आव्हाने, शेतकऱ्यांचे हित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण यावर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घुले पाटील यांच्या बिनविरोध निवडीनंतर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. माजी अध्यक्ष कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत, घुले पाटील जिल्हा बँकेला अधिक उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.



