मुंबई | नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा असल्यास लाभार्थींनी ई-केवायसी करणे आवश्यक ठरणार आहे. ई-केवायसी न केल्यास नोव्हेंबरपासूनचा हप्ता थांबवण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्या महिलांना केवायसीसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ बंद केला जाऊ शकतो.
मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते यावर मिळणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सद्यस्थितीत, केवायसी न केलेल्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही अशी चर्चा सुरु आहे. तथापि, सरकारकडून याबाबत कोणताही अधिकृत निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन महिन्यांचे हप्ते मिळतील का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
ई-केवायसी करताना अनेक महिलांना आधार अपलोड न होणे, ओटीपी न येणे, साईट स्लो होणे अशा विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अनेक अडथळे येत आहेत. तुम्ही लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी असाल, तर नोव्हेंबरपासूनचा हप्ता बंद होण्याआधी त्वरित ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सरकारकडून लवकरच अधिकृत सूचना येण्याची शक्यता आहे.