नाशिक । नगर सहयाद्री:-
बिबट्याचा वावर असलेल्या शहराजवळील लोहशिंगवे येथे शुक्रवारी सकाळी ३० वर्षाच्या युवकाचा छिनविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा दावा असताना साडेपाच फूट उंचीच्या व्यक्तीवर बिबट्याने कसा हल्ला चढवला असेल, असा वन विभागाचा प्रश्न आहे. शवविच्छेदन अहवालातून या सर्व बाबी स्पष्ट होतील, असे यंत्रणांनी म्हटले आहे. यामुळे युवकाच्या मृत्युबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सुदाम जुंद्रे (३०) असे या युवकाचे नाव आहे. लोहशिंगवे गावात सकाळी त्याचा मृतदेह आढळला. देवळालीच्या तोफखाना स्कूलच्या फायरिंग रेंज अर्थात लष्करी हद्दीलगत हे गाव आहे. या भागात बिबट्यांचा संचार आहे. बिबट्याच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. सुदामच्या मृतदेहाची अवस्था पाहून त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सुमित निर्मळ आणि प्रशांत खैरनार या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली. संबंधित युवकाच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा आढळल्या. ज्या ठिकाणी युवकाचा मृतदेह आढळला, तिथून काही अंतरावर मक्याचे शेत आहे. तिथे बिबट्यांचे ठसे आढळल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आजवरच्या बिबट्याच्या हल्ल्याचा घटनांचा आढावा घेतल्यास तो कमी उंचीच्या, जमिनीवर बसलेल्या व्यक्तींवर हल्ला करीत असल्याचे दिसून येते. बिबट्यांच्या हल्ल्यात कमी उंचीच्या, म्हणजे एक ते तीन वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. दिंडोरीत शेतात काम करणाऱ्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सिन्नरला पाच वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
लोहशिंगवे येथील घटना वन विभागाला वेगळी वाटते. मृत ३० वर्षीय सुदामची उंची किमान साडेपाच फूट आहे. जेव्हा हल्ला झाला, तेव्हा तो कोणत्या स्थितीत होता, याची स्पष्टता नाही. डोक्याची कवटी फुटली आहे. अशा काही गोष्टीमुळे बिबट्या साडेपाच फूट उंचीच्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो का, असा प्रश्न वन विभागाला सतावत आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून उपरोक्त भागात आणखी दोन पिंजरे बसविण्यात आले आहेत.
मृत युवकाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची स्पष्टता होईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले.



