सुपा । नगर सहयाद्री:-
केंद्र शासनाच्या वतीने “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येत असून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट रोजी शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सोसायटी कार्यालय यासह प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलात फडकू लागला आहे.हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आज १४ ऑगस्ट रोजी पारनेर तालुक्यातील कडूस ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सामाजिक कार्य करण्यासाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व व ग्रामपंचायत मधील प्रत्येक काम मन लाऊन व प्रामाणिक पणे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी पापुभाई शेख यांना आज ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.
१५ ऑगस्ट २६ जानेवारी रोजी दरवर्षी सरपंच, उपसरपंच यांना हा मान मिळतो. फक्त त्यांनीच झेंडा वंदन करायचे अशी ग्रामीण भागात प्रथा आहे. मात्र कडूसमध्ये या सर्व प्रथेला फाटा देत एका कर्मचाऱ्याच्या कामाची पोहोच पावती मिळाली आहे.
प्रामाणिक पणे काम करणाऱ्याला झेंडावंदन करण्याचा मान देण्यात आला. १५ वर्षात प्रथमच कडुस गावमध्ये व तालुक्यामध्ये कर्मचारी यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा मान दिला असल्याचे सरपंच मनोज मुंगसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.