कांदा भाववाढीसाठी सरकार सकारात्मक; निर्यातबंदी लवकरच उठेल
आ. काशिनाथ दाते । निघोज येथील अन्नत्याग आंदोलन स्थगित
निघोज । नगर सहयाद्री:-
कांदा भाववाढीसाठी सरकार सकारात्मक असून निर्यातबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कांद्याचे दर वाढतील, असा विश्वास आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केला. निघोज येथे ‘आपली माती आपली माणसं’ संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण आणि शिवसेना (उबाठा गट) निघोज पंचायत समिती गणप्रमुख महेंद्र पांढरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन गुरुवारी सायंकाळी आमदार दाते यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन सोडण्यात आले. शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी आणि कांदा निर्यातबंदी उठवावी यांसारख्या मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन निघोज एसटी स्थानक परिसरात चार दिवस सुरु होते.
आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि दीपक अण्णा लंके यांच्या मध्यस्थीनंतर अंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी आमदार दाते म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी मी थेट संपर्क साधून या आंदोलनाची सविस्तर माहिती दिल्याचे सांगितले. कांदा प्रश्न राज्यासाठी अत्यंत संवेदनशील असून निर्यातबंदी लवकरच उठवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक आहे. कर्जमाफीबाबतही सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीपक आण्णा लंके यांनी खासदार डॉ. नीलेश लंके कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवत असून त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत, अशी माहिती दिली. त्यांनी अन्नत्याग आंदोलनाचे कौतुक करताना यामागील शेतकरीहिताच्या भूमिकेचे समर्थन केले.
यावेळी उपोषणकर्ते रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, सामाजिक कार्यकर्ते देवरामबुवा लामखडे, उत्तमराव लामखडे, शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, वारकरी मंडळाचे अध्यक्ष बबनराव थोरात महाराज, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, संतोषशेठ रसाळ, विठ्ठलराव कवाद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामतीताई कवाद, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप ढवण आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी हिताची भूमिका; आ. दाते
उपोषणकर्ते ढवण आणि पांढरकर यांनी घेतलेली भूमिका शेतकरी हिताची असून त्यांच्या आंदोलनाला शिरूर व पारनेर तालुक्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. या मागण्या लवकरच मंजूर व्हाव्यात यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. सरकारकडूनही या विषयावर सकारात्मक पावले उचलली जात आहेत, असे आमदार काशिनाथ दाते यांनी सांगितले. कांदा उत्पादन, शेतकऱ्यांची स्थिती आणि सरकारची भूमिका याविषयी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनाही वस्तुस्थितीची माहिती आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आम्ही शासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहोत अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा; माजी आमदार कळमकर
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनजागृती करणारे आंदोलन उभारून रुपेश ढवण आणि महेंद्र पांढरकर यांनी समाजासमोर सकारात्मक उदाहरण मांडले मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी एक ज्योत पेटवली आणि आज त्या ज्योतींच्या उजेडात आरक्षणाचा मार्ग मोकळा होत आहे. त्याच धर्तीवर रुपेश ढवण लोकांच्या प्रश्नांसाठी झगडत असून कोणतेही आंदोलन म्हटले की त्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. एक निष्ठावान व संघर्षशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याला मी माझा पूर्ण पाठिंबा देणार असून भविष्यातही मी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहीन,असेही माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी स्पष्ट केले.
शासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींचा पाठिंबा; रुपेश ढवण
चार दिवस चाललेल्या अन्नत्याग आंदोलनाबाबत माहिती देताना उपोषणकर्ते रुपेश ढवण म्हणाले की, या काळात एकही शासकीय अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नाही, आंदोलनाची टिंगलटवाळी करण्यात आली. मात्र खासदार डॉ. नीलेश लंके व आमदार काशिनाथ दाते यांनी दूरध्वनीवरून सतत संपर्क ठेवत पाठिंबा दिला. आमदार दाते व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि कांद्याला प्रति किलो किमान ४० रुपये दर मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती दिली. मागण्या येत्या २२ ऑगस्टपर्यंत मान्य न झाल्यास पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचे शेतकरी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी ढवण यांनी दिला.