संगमेनर । नगर सहयाद्री:-
अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात संततधार पाऊस सुरू असून दोन्ही धरणात पाण्याची प्रचंड आवक सुरू आहे. सातत्याने पाण्याची आवक होत असल्याने निळवंडे धरणातून व भंडारदरा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. 8 जुलै रोजी निळवंडे मधून 12 हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला होता तर भंडारदरा धरणातून 9 हजार 774 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रवरेला पूरसदृश पाणी आले आहे.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रवरा नदीला पूर आल्याने ओझर बुद्रुक व खुर्दला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. प्रसिद्ध श्री जगदंबा माता (जगुबाई) मंदिराला पाण्याने वेढले आहे. दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. प्रवरा व म्हाळुगी नदीला पूर आला आहे.
ओझर बंधाऱ्यावरून सुमारे 15 हजार 115 क्युसेक पाणी नदीपात्रात तर उजव्या कालव्यातून शंभर व डाव्यातून पाचशे क्युसेक पाणी वाहत आहे. प्रवरा नदी पात्रातील पाण्यामुळे ओझर बुद्रुक व ओझर खुर्दला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने कनोली, कनकापूर, ओझर बुद्रुक या गावांचा आश्वी बुद्धकशी संपर्क तुटला आहे. श्री जगदंबा माता मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात मुसळधार ! पुरामुळे गावांचा संपर्क तुटला
नागपूर, वर्धा आणि गडचिरोलीसह विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने अक्षरश:झोडपून काढले आहे. रविवरी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही थांबलेला नसून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातही पूरस्थिती गंभीर बनली असून, गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यांच्यासाठी मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून, शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या 60 तासांत सुमारे 172.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून, शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांच्यासाठी मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. नागपूर, गडचिरोली,चंद्रपूर, गोंदियासह वर्धा जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून, पूल देखील वाहून गेले आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक तालुक्यातील रस्त्यांना देखील पुराचा फटका बसल्याची माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हिंगणघाट, देवळी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरमध्ये भयंकर स्थिती
नागपूर जिल्ह्यात 9 जुलै रोजीही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी देण्यात आली आहे. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा नेत्र विभाग पाण्याखाली गेला आहे. तसेच नरसाळा भागात पोहरा नदीने रौद्ररूप धारण केल्याने अनेक घरांमध्ये नागरिक अडकले आहे. तर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून बोटींच्या साहाय्याने बचावकार्य सुरू असून, अजूनही 10 ते 12 लोक घरात अडकले असण्याची शक्यता आहे.